एकच स्वप्न वारंवार का पडते? | यामागे काय कारण असते?
एकच स्वप्न पुन्हा पुन्हा का पडतं? कधी तुम्हालाही असे झाले आहे का?
रात्री झोपल्यानंतर तेच स्वप्न पुन्हा पुन्हा दिसते. कधी एखादी व्यक्ती, कधी एखादी जागा, कधी गर्दी, कधी अपघातासारखी घटना, तर कधी पळत असल्याचे स्वप्न...
आणि सकाळी उठल्यावर तुम्ही स्वतःलाच विचारता की,
“हेच स्वप्न मला पुन्हा का पडलं?”
त्यानंतर काही दिवसांनी किंवा काही आठवड्यांनी तेच स्वप्न पुन्हा पडले, तर मनात आणखी एक प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे..
“हे स्वप्न पडण्यामागे काही संकेत आहे का?”
अशा अनुभवामुळे अनेकांना हे स्वप्न केवळ योगायोग नसून त्यामागे काही खोल अर्थ असावा असे वाटते. पण खरंच वारंवार पडणाऱ्या या स्वप्नांना काही अर्थ असतो का?
याचे उत्तर फक्त अध्यात्मात नाही आणि फक्त विज्ञानातही नाही. मानसशास्त्र, झोपेचे विज्ञान, आपल्या भावना, अनुभव आणि काही सांस्कृतिक-अध्यात्मिक समजुती यांचा विचार केला तर या अनुभवाकडे अधिक समतोलपणे पाहता येते.
विषयाची ओळख
एकच स्वप्न नेहमी का पडते?
एकच स्वप्न वारंवार पडद्यामागे अनेक कारणं असछ शकतात, परंतु याचे एकच निश्चित कारण सांगता येत नाही.
काही संशोधन आणि मानसशास्त्रीय सिद्धांतांनुसार वारंवार पडणारी स्वप्ने आपल्या मनातील ताण, चिंता, दबाव, दुःख, अपूर्ण भावना, भीती, अपराधीपणा, आठवणी एखादा तीव्र अनुभव किंवा सतत मनात चालणाऱ्या एखाद्या विषयाशी संबंधित असू शकतात.
उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीला नोकरीची चिंता असेल आणि दिवसभर त्याच्या मनात तेच विचार चालू असतील, तर झोपेत असताना त्याच भावनेशी संबंधित वेगवेगळ्या स्वरूपाची स्वप्नं त्याला पडू शकतात.
कधी स्वप्नातील घटना बदलते, पण त्यामागची भावना मात्र तीच असते.
उदा.
- परीक्षेला जाताना उशीर होणे
- उशीर झाल्याने ट्रेन चुकणे
- एखाद्या ठिकाणी अडकून पडणे
- कोणी आपला पाठलाग करणे
- उंचावरून खाली पडणे
ही स्वप्ने वेगवेगळी असली तरी त्यामागे भीती, असुरक्षितता किंवा नियंत्रण सुटल्याची भावना असू शकते.
मात्र प्रत्येक स्वप्नाचा एक ठरावीक किंवा निश्चित असा अर्थ असतो, हे विज्ञानाने सिद्ध केलेले नाही.
वारंवार स्वप्न पडण्यामागची संभाव्य कारणे
दिवसभर आपण अनेक गोष्टींबाबत विचार करतो.
कामाचा ताण, आर्थिक चिंता, नातेसंबंधातील समस्या, आरोग्याची काळजी, मानसिक दबाव, भविष्याबद्दलची भीती किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय...
जाणीवपूर्वक आपण त्या विषयाकडे दुर्लक्ष केले तरी त्याचा मनावर परिणाम राहू शकतो.
जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळी काही लोकांना त्या चिंतेशी किंवा घटनांशी संबंधित स्वप्ने वारंवार पडू शकतात.
2. एखादी अपूर्ण भावना
काही वेळा घटना घडून गेलेली किंवा संपलेली असते, पण तिच्याशी संबंधित भावना मनात राहिलेली असते.
उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीसोबत तुमचा गैरसमज झाला आणि तो विषय तुमच्या मनात तसाच पडून राहिलेला असेल.
दिवसभर आपण त्याबद्दल विचार जरी केला नसेल, तरी ती व्यक्ती किंवा त्याच्याशी संबंधित परिस्थिती स्वप्नात पुन्हा दिसू शकते.
याचा अर्थ असा होत नाही की, त्या व्यक्तीने आपल्याला काही संदेश पाठवला आहे.
पण असे असले तरी आपल्या मनात त्या अनुभवाचा भावनिक ठसा तसाच राहू शकतो.
3. जुन्या आठवणी
स्वप्नांमध्ये आपल्याला लहानपण, जुन्या आठवणी किंवा काही घटनांबाबत काही गोष्टी थोड्याफार प्रमाणात दिसू शकतात.
बालपणीचे घर, शाळा, महाविद्यालय, जुने मित्र मैत्रिणी, एखादा रस्ता किंवा अनेक वर्षांपूर्वी घडलेली घटना अचानक स्वप्नात दिसू शकते.
काही वेळा एखाद्या वर्तमानातील म्हणजे सध्या आलेल्या अनुभवामुळे जुनी आठवण सक्रिय होऊ शकते.
म्हणूनच स्वप्नात दिसणारी व्यक्ती किंवा जागा ही नेहमी त्या व्यक्तीबद्दल किंवा जागेबद्दलच असेल असे नाही. म्हणजे तशा प्रकारची स्वप्नं पडतात.
विज्ञान काय सांगते?
स्वप्नांचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना, स्वप्ने नेमकी का पडतात, त्यांचे सर्व कार्य कसे चालते आणि प्रत्येक स्वप्नाचा अर्थ काय असतो याबाबत अजूनही अनेक प्रश्न आहेत.
विज्ञानानुसार स्वप्न म्हणजे झोपेत असताना मेंदूमध्ये निर्माण होणारे विचार, प्रतिमा, भावना आणि आठवणींचे अनुभव आहे.
झोपेच्या REM (Rapid Eye Movement) अवस्थेत स्वप्ने अधिक जिवंत आणि स्पष्टपणे अनुभवली जाऊ शकतात. मात्र स्वप्ने फक्त REM झोपेतच पडतात असे मानणे योग्य नाही.रं
झोपेदरम्यान मेंदू आठवणी, भावना, चिंता अशा विविध माहितीवर प्रक्रिया करत असतो. काही सिद्धांतांनुसार स्वप्ने ही या प्रक्रियेशी संबंधित असू शकतात.
म्हणूनच वारंवार पडणारे स्वप्न म्हणजे मेंदू एखाद्या विषयावर प्रक्रिया करत आहे, अशी शक्यता काही परिस्थितींमध्ये विचारात घेतली जाते.
स्वप्न हे मेंदूच्या झोपेतील सक्रियतेचा नैसर्गिक भाग आहे. त्यांचा अर्थ हा प्रत्येक व्यक्तीच्या अनुभवानुसार वेगळा असू शकतो.
पण “हे स्वप्न म्हणजे नक्कीच हा संदेश” असे वैज्ञानिकदृष्ट्या ठामपणे सांगता येत नाही.
मानसशास्त्र काय सांगते?
मानसशास्त्रानुसार स्वप्ने ही आपले विचार, भावना, इच्छा, मानसिक ताण किंवा दबाव, तसेच आठवणींशी संबंधित असू शकतात.
काही मानसशास्त्रीय सिद्धांतांनुसार अशी स्वप्ने व्यक्तीच्या भावनिक संघर्ष, चिंता, जीवनातील चढ उतार किंवा समस्यांशी संबंधित असू शकतात.
काही स्वप्नं आपल्या दडलेल्या किंवा व्यक्त न झालेल्या भावनांशी तसेच जुन्या आठवणींशी संबंधित असू शकतात.
आपल्याला वारंवार पडणारी स्वप्ने कधी कधी मनातील न सुटलेला भावनिक संघर्ष दर्शवू शकतात.
प्रत्येक स्वप्नाचा एकच ठराविक अर्थ असतो असे आधुनिक मानसशास्त्र मानसशास्त्र मानत नाही.
थोडक्यात सांगायचे तर मानसशास्त्र हे स्वप्नांकडे भविष्यवाणी म्हणून नव्हे तर मेंदू आणि मनातील भावना आणि अनुभव समजून घेण्याच्या खिडकी प्रमाणे पाहते.
उदाहरणार्थ:
स्वप्न – तुम्ही सतत परीक्षेला उशिरा पोहोचता
याचा अर्थ तुम्ही प्रत्यक्षात परीक्षा देणार आहात असं होत नाही.
पण कदाचित सध्या तुमच्या जीवनात एखाद्या कामाबद्दल...
“मी वेळेत पूर्ण करू शकेन का?” किंवा वेळेत पूर्ण होईल का?
अशी चिंता असू शकते.
त्याचप्रमाणे...
स्वप्नात सतत पळणे
याचा अर्थ प्रत्यक्षात कोणीतरी तुमचा पाठलाग करत आहे असा नसतो.
काही वेळा हे स्वप्न ताण, भीती किंवा एखाद्या परिस्थितीपासून दूर जाण्याच्या भावनेशी जोडले जाऊ शकते.
प्रत्येक व्यक्तीसाठी मात्र अर्थ वेगळा असू शकतो.
स्वप्नात घटना बदलते तरी भावना तीच राहते का?
असे होऊ शकते. खरे तर हा एक अतिशय मनोरंजक भाग आहे.
समजा एखाद्या व्यक्तीला आपल्या भविष्याबद्दल असुरक्षित वाटत आहे.
एकदा रात्री त्याला रस्ता हरवल्याचे म्हणजे रस्ता सापडत नाही असे स्वप्न पडते.
त्यानंतर काही दिवसांनी तो परीक्षेला उशिरा पोहोचला असे स्वप्न पडते.
तर नंतर तो स्वप्नात एखाद्या अंधाऱ्या ठिकाणी अडकतो.
या सर्व घटना वेगळ्या आहेत.
पण तिन्ही स्वप्नांमध्ये “मला काय करावे हे समजत नाही” किंवा “मी नियंत्रण गमावत आहे” अशी भावना समान असू शकते.
म्हणून स्वप्नाचा अर्थ समजून घेताना फक्त 'काय दिसले?' एवढे न पाहता 'त्या वेळी मला काय वाटत होते?' हे सुद्धा महत्त्वाचे ठरू शकते.
अध्यात्म काय सांगते?
ैअध्यात्मिक दृष्टीकोनातून स्वप्नांना केवळ मनाचा खेळ न मानता, भविष्यातील संकेत, पूर्वकर्म आणि मानसिक स्थितीचे प्रतिबिंब मानले जाते.
अध्यात्म आणि पारंपरिक स्वप्नशास्त्रामध्ये स्वप्नांना वेगवेगळे अर्थ दिले जातात.
काही परंपरांनुसार जे स्वप्न नेहमी पडते, ते स्वप्न एखाद्या अपूर्ण गोष्टीकडे लक्ष वेधणारे संकेत असू शकते.
काही लोकांच्या मते स्वप्नांमधून अंतर्मन आपल्याशी संवाद साधते.
दिवसभरातील विचार, ताणतणाव, आणि पडलेले प्रश्न रात्री स्वप्नांच्या माध्यमातून बाहेर येते.
काही स्वप्नं ही भविष्यात घडणाऱ्या शुभ किंवा अशुभ घटनांचे पूर्वसंकेत देणारी असतात.
पहाटे ब्रह्म मुहूर्तावर (पहाटे ३ तर ६) दरम्यान पाहिलेली स्वप्ने सहसा खरी ठरतात असा अध्यात्मिक समज आहे.
उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला जर स्वप्नात वारंवार पाणी दिसत असेल, एखादी विशिष्ट व्यक्ती दिसत असेल किंवा एखाद्या ठिकाणी जाण्याचे स्वप्न पडत असेल, तर त्याचा आध्यात्मिक अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला जातो.
परंतु येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे, ते म्हणजे या आध्यात्मिक अर्थांना वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले सार्वत्रिक नियम समजता येत नाही.
त्यामुळे अशा स्वप्नांकडे श्रद्धा किंवा वैयक्तिक चिंतनाच्या दृष्टीने पाहता येते; मात्र मोठे निर्णय घेण्यापूर्वी वास्तव परिस्थितीचाही विचार केला पाहिजे.
वास्तविक उदाहरणे
उदाहरण 1 – नोकरीची चिंता
एका व्यक्तीला अनेक दिवसांपासून ऑफिसमधील कामाचा खूप ताण आहे.
त्याला अनेकदा असे स्वप्न पडते की तो ऑफिसमध्ये पोहोचला आहे, पण महत्त्वाचे काम पूर्ण होत नाही.
आता हे स्वप्न भविष्यात काहीतरी वाईट होणार आहे याचा संकेत आहे असे मानण्यापेक्षा, ते त्याच्या कामाच्या ताणाशी संबंधित असून त्याच दृष्टिकोनातून पाहणे योग्य ठरेल.
उदाहरण 2 – जुना मित्र
अनेक वर्षांपासून संपर्कात नसलेला एखादा मित्र अचानक वारंवार स्वप्नात दिसतो.
याचा अर्थ तो मित्र सारखी आपली आठवण काढत आहे किंवा काहीतरी संदेश देत आहे असे निश्चितपणे म्हणता येत नाही.
कदाचित अलीकडे घडलेल्या ऊएखाद्या प्रसंगामुळे त्या काळातील आठवणी जाग्या झाल्या असतील.
उदाहरण 3 – सतत खाली पडण्याचे स्वप्न
काही लोकांना उंचावरून खाली पडण्याचे स्वप्न वारंवार पडते.
अशा स्वप्नांना अनेक लोक वेगवेगळे आध्यात्मिक किंवा पारंपरिक अर्थ देतात.
पण वैज्ञानिक दृष्टिकोनातून झोपेतील शारीरिक संवेदना, झोपेतील बदल, ताण किंवा इतर घटकांचाही विचार करावा लागतो.
Myth vs Fact
| Myth | Fact |
|---|---|
| प्रत्येक स्वप्नाचा एक निश्चित अर्थ असतो | प्रत्येक स्वप्नाचा सार्वत्रिक अर्थ असल्याचे वैज्ञानिक पुरावे नाहीत |
वारंवार स्वप्न पडले म्हणजे भविष्यवाणी असते |
असे निश्चितपणे म्हणता येत नाही |
वाईट स्वप्न म्हणजे वाईट घटना घडणार |
स्वप्न व भविष्यातील घटना यांचा थेट संबंध सिद्ध झालेला नाही |
स्वप्नात मृत व्यक्ती दिसली म्हणजे काही संदेश असतो |
हे वैयक्तिक श्रद्धा किंवा अनुभवाचा भाग असू शकतो |
| एकच स्वप्न पडत असेल तर गंभीर समस्या असते | अनेकदा तणाव, भावना किंवा आठवणींसारखी सामान्य कारणेही असू शकतात |
तुम्हाला माहिती आहे का?
वारंवार पडणारी स्वप्ने नेहमी अगदी तशीच असतील म्हणजे तशाच प्रकारे दिसतील असे नाही.
अनेक वेळा स्वप्नातील पात्रे, ठिकाणं आणि घटना बदलतात; मात्र त्यामागची भावना किंवा परिस्थिती सारखी राहू शकते.
उदा. एका व्यक्तीला एकदा पळत असल्याचे आणि दुसऱ्या वेळी कुठेतरी अडकून पडल्याचे स्वप्न पडू शकते.
दोन्ही स्वप्नांमध्ये भीती किंवा नियंत्रण नसल्याची भावना समान असू शकते.
म्हणूनच recurring dream समजून घेताना स्वप्नातील प्रत्येक वस्तूचा स्वतंत्र 'गुप्त', 'गुढ' अर्थ शोधण्यापेक्षा आपल्या भावनिक स्थितीकडे लक्ष देणे अधिक उपयोगी ठरू शकते.
एकच स्वप्न वारंवार पडत असेल तर काय करावे?
सर्वप्रथम महत्वाचे म्हणजे घाबरू नका.
रात्री झोपेत स्वप्नं पडणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे.
परंतु ते स्वप्न जर वारंवार पडत असेल, तर स्वतःला काही प्रश्न विचारा:
- सध्या मला कोणत्या गोष्टीचा मोठा ताण आहे?
- अलीकडे कोणती घटना मला भावनिकदृष्ट्या प्रभावित करून गेली?
- हे स्वप्न पडण्यापूर्वी मी काय किंवा कशाचा विचार करत होतो?
- स्वप्नात मला नेमकी कोणती भावना जाणवते?
- माझी झोपेची वेळ किंवा पद्धत यामध्ये अलीकडे काही बदल झाला आहे का?
हे करून पाहा
सकाळी उठल्यानंतर स्वप्नातील महत्त्वाच्या, आठवतील त्या गोष्टी लिहून ठेवा.
उदा.
तारीख: 14 ऑगस्ट
स्वप्न: जुने घर दिसले
भावना: भीती वाटली
स्वप्नापूर्वीचा दिवस: ऑफिसमध्ये तणाव
विशेष घटना: जुन्या मित्राशी चर्चा
असे काही दिवस लिहिल्यानंतर काही नमुना दिसतो का हे पाहता येईल.
वारंवार पडणारी स्वप्ने कधी गंभीरपणे घ्यावीत?
परंतु जर स्वप्नांमुळे—
- झोप सतत उडत असेल,
- झोपण्याची भीती वाटत असेल,
- दिवसभर थकवा जाणवत असेल,
- चिंता वाढत असेल,
- किंवा एखाद्या अत्यंत त्रासदायक अनुभवाशी संबंधित थस्वप्ने वारंवार पडत असतील,
तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे उपयोगी ठरू शकते.
विशेषतः सतत त्रासदायक nightmares असल्यास मानसिक आरोग्य तज्ज्ञ किंवा झोपेच्या समस्यांशी संबंधित डॉक्टरांशी बोलणे योग्य ठरू शकते.
महत्त्वाचे मुद्दे
एकच स्वप्न वारंवार का पडते?
याचे एकच असे उत्तर नाही.
लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी:
- वारंवार पडणारी स्वप्ने ताण आणि चिंतेशी संबंधित असू शकतात.
- अपूर्ण भावना किंवा जुन्या आठवणी त्यामागे असू शकतात.
- झोपेची गुणवत्ता तसेच झोपेतील बदलांचाही विचार करावा.
- स्वप्नातील घटना बदलली तरी भावना समान राहू शकते.
- प्रत्येक स्वप्नाला ठरावीक वैज्ञानिक अर्थ असतो हे सिद्ध झालेले नाही.
- अध्यात्मामध्ये स्वप्नांना विविध अर्थ दिले जातात, पण ते सार्वत्रिक वैज्ञानिक नियम नाहीत.
- स्वप्नांमुळे जर दैनंदिन जीवनावर परिणाम होत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
निष्कर्ष
एकच स्वप्न वारंवार का पडते? याचे उत्तर शोधताना केवळ स्वप्नात काय दिसले यापेक्षा आपल्या आयुष्यात सध्या काय घडत आहे आणि त्या स्वप्नात आपल्याला काय वाटते हे पाहणे किंवा जाणून घेणे अधिक महत्त्वाचे ठरू शकते.
कधी ते ताणाचे प्रतिबिंब असू शकते, कधी एखाद्या जुन्या आठवणीचा प्रभाव असतो तर कधी आपल्या मनात सुरू असलेल्या भावनिक प्रक्रियेचा तो एक भाग असू शकतो.
अध्यात्माच्या दृष्टीने काही लोक वारंवार पडणाऱ्या स्वप्नांकडे संकेत म्हणून पाहतात. मात्र त्याला निश्चित भविष्यवाणी मानण्या अगोदर वैज्ञानिक आणि मानसशास्त्रीय शक्यतांचाही विचार केला पाहिजे.
शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा
स्वप्न म्हणजे नेहमी भविष्याचा संकेत किंवा संदेश असेलच असे नाही; कधी कधी ते आपल्या मनात आधीपासून सुरू असलेल्या गोष्टींचे प्रतिबिंब असू शकते.
आणि कदाचित म्हणूनच एखादे स्वप्न पुन्हा पुन्हा आपल्याला पडत असते.
FAQ – नेहमी विचारले जाणारे प्रश्न
1. एकच स्वप्न वारंवार का पडते?
ताण, चिंता, अपूर्ण भावना, जुन्या आठवणी, झोपेतील बदल किंवा एखाद्या विषयावर सततचा विचार करणे यांसारख्या अनेक कारणांमुळे वारंवार एकसारखी स्वप्ने पडू शकतात.
2. वारंवार एकच स्वप्न पडणे म्हणजे भविष्यवाणी आहे का?
तसे निश्चितपणे म्हणता येत नाही. वारंवार येणाऱ्या स्वप्नांचा भविष्यातील घटनांशी थेट संबंध असल्याचे ठोस असे वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत.
3. एखादी व्यक्ती स्वप्नात वारंवार का दिसते?
तर त्या व्यक्तीशी संबंधित आठवणी, भावना किंवा अलीकडील एखादा अनुभव आपल्या मनात सक्रिय झाल्यामुळे ती व्यक्ती स्वप्नात दिसू शकते. याचा अर्थ त्या व्यक्तीकडून काही संदेश आहे असे निश्चित म्हणता येत नाही.
4. वाईट स्वप्न वारंवार पडत असल्यास काय करावे?
झोपेची नियमित वेळ ठेवणे, ताण तणाव कमी करण्याचा प्रयत्न करणे आणि पडलेली स्वप्ने लिहून ठेवणे उपयोगी ठरू शकते. स्वप्नांमुळे झोप किंवा दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
5. स्वप्नातील प्रत्येक गोष्टीला काही अर्थ असतो का?
असे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाही. स्वप्नात दिसणारी एखादी व्यक्ती, प्राणी किंवा वस्तूचा अर्थ सर्वांसाठी समान असेलच असे नाही.
6. स्वप्न वारंवार पडते पण सकाळी आठवत नाही, असे का?
स्वप्ने आठवण्याची क्षमता ही प्रत्येक व्यक्तीनुसार बदलते. जागे झाल्यानंतर काही वेळात स्वप्नाची आठवण कमी होऊ शकते.
7. एकच स्वप्न अनेक वर्षांनी पुन्हा पडू शकते का?
होय, असे नक्की होऊ शकते. एखाद्या जुन्या आठवणीशी किंवा भावनेशी संबंधित परिस्थिती पुन्हा निर्माण झाल्यास पूर्वीच्या स्वप्नासारखा अनुभव येऊ शकतो.
संबंधित लेख (Related Articles)
सहावे इंद्रिय जागृत करण्याचे 7 प्रभावी मार्ग
डेजा व्हू म्हणजे काय? ही लक्षणे तपासा
तुम्हाला Sixth Sense आहे का? ही 10 लक्षणे तपासा https://sixthsensemarathi.blogspot.com/2026/07/sixth-sense-10.html
अचानक अस्वस्थ वाटणे! हा Sixth Sense संकेत असू शकतो ______________________________________________युट्यूब चॅनल- Sixth Sense Power
विश्वासार्ह संदर्भ – References
- American Academy of Sleep Medicine (AASM) – Sleep and dreaming related information
- National Institute of Neurological Disorders and Stroke (NINDS) – Brain and sleep information
- Sleep Foundation – Dreams and recurring dreams related educational resource
- National Center for Biotechnology Information (NCBI/PubMed) – Scientific literature on dreaming, sleep and emotional processing
टीप: स्वप्नांच्या अर्थाबाबत विविध मानसशास्त्रीय आणि वैज्ञानिक सिद्धांत आहेत. त्यामुळे कोणत्याही एका सिद्धांताला प्रत्येक व्यक्तीसाठी निश्चित सत्य मानणे योग्य नाही.
तुमचे मत काय?
तुम्हाला एकच स्वप्न वारंवार पडते का? किंवा एखादे स्वप्न इतके वारंवार पडते की ते योगायोग आहे की काही संकेत? असा प्रश्न तुम्हाला पडतो?
तुमचा स्वप्नातील अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा.
तुमचा अनुभव इतर वाचकांसाठीही विचार करायला लावणारा ठरू शकतो.
अशाच स्वप्न, मानसशास्त्र, अध्यात्म आणि Sixth Sense संबंधित माहितीपूर्ण लेखांसाठी Sixth Sense Marathi ला पुन्हा भेट द्या.







Very nice and useful article..👍
उत्तर द्याहटवा