एखादी व्यक्ती आठवली आणि लगेच तिचा फोन आला, असे का होते? योगायोग की Sixth Sense?

कधी तुमच्यासोबत असे झाले आहे का? अचानक कोणतेही कारण नसताना एखाद्या जुन्या मित्राची किंवा नातेवाईकाची आठवण आली. तुम्ही मनात म्हणालात, “किती दिवस झाले याच्याशी बोललो नाही…” आणि काही मिनिटांतच तुमचा मोबाईल खणखणला.

स्क्रीनवर नेमकी त्याच व्यक्तीचे नाव दिसले!

हे घडल्यावर क्षणभर आपण थक्क होतो आणि विचार करतो की, मी मघाशीच त्यांच्याबद्दल विचार करत होतो.

नंतर आपल्या मनात लगेच प्रश्न येतो - “मी त्याचा विचार केला म्हणून त्याने मला फोन केला का? की त्याला फोन करण्याआधीच माझ्या मनाला त्याची जाणीव झाली होती?”

काही लोक याला साधा योगायोग मानतात. काही जण यामागे अवचेतन मनाची (Subconscious Mind) भूमिका असल्याचे सांगतात, तर काही लोक याला Sixth Sense किंवा सहावे इंद्रिय मानतात.

पण यामागे नेमके काय असू शकते?


विषयाची ओळख

प्रत्येकाच्या आयुष्यात अशा अनेक घटना घडतात ज्यांचे स्पष्टीकरण आपल्याला लगेच सापडत नाही.

आपल्याला एखाद्या व्यक्तीची अचानक आठवण येते आणि त्यानंतर त्या व्यक्तीचा फोन येतो ही त्यापैकीच एक घटना आहे.

अशा प्रकारच्या घटना आपल्यापैकी बहुतेक लोकांच्या आयुष्यात कधी ना कधी घडलेल्या असतात. काही लोक याला योगायोग (coincidence) म्हणून दुर्लक्ष करतात. 

विशेषतः ज्या व्यक्तीशी आपले भावनिक नाते असते, तिच्याबाबतचे असे अनुभव जास्त लक्षात राहू शकतात.

परंतु येथे एक महत्त्वाचा फरक समजून घेणे आवश्यक आहे.

एखादी घटना आपल्याला रहस्यमय वाटते, याचा अर्थ तिच्यामागे अद्भूत किंवा अलौकिक किंवा दैवी शक्ती आहे असे होत नाही.

मात्र विज्ञान अशा अनुभवांकडे मेंदूची कार्यपद्धती, साठवलेल्या आठवणी, भावनिक संबंध, योगायोग आणि आपली विचार करण्याची पद्धत या माध्यमातून पाहते.

अध्यात्मिक परंपरांमध्ये मन, अंतर्ज्ञान आणि सूक्ष्म संवेदनांबद्दल वेगवेगळ्या कल्पना आढळतात.

विज्ञान, मानसशास्त्र आणि अध्यात्म या तिन्ही क्षेत्रांमध्ये या घटनेकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते.

आजच्या लेखामध्ये आपण सविस्तर समजून घेणार आहोत की, एखाद्याची आठवण काढली आणि तिचा लगेच फोन आला, तर यामागे नेमके काय कारण असू शकते.


मुख्य माहिती

एखादी व्यक्ती अचानक का आठवते?

मानवी मन हे अतिशय गुंतागुंतीचे आणि खूप शक्तिशाली आहे. आपण ज्या व्यक्तीबद्दल विचार करतो त्या व्यक्तीबद्दल आपले भावनिक नाते असते, अनुभव असतो. 

जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीची तीव्रतेने आठवण काढतो. तेव्हा आपल्या मेंदूमध्ये विशिष्ट प्रकारच्या लहरी ( Brain Waves) तयार होतात असे मानले जाते.

आपल्या मेंदूमध्ये असंख्य आठवणी साठलेल्या असतात. म्हणजे एखादा आवाज, वास, गाणे, ठिकाण, शब्द किंवा एखादी भावना अचानक जुन्या आठवणीला जागे करू शकते.

अनेकदा आपल्याला अशी आठवण का आली? हे सुद्धा समजत नाही.

उदाहरणार्थ, तुम्ही रोजच्या कामात व्यस्त असताना अचानक बालपणीच्या एखाद्या मित्राची आठवण येणे.

आता असे का घडते कारण त्या मित्राशी संबधित एखादी छोटीशी गोष्ट तुम्ही नकळत पाहिली असेल. 

एखाद्या व्यक्तीचा चेहरा, एखादा शब्द किंवा वातावरणाने मेंदूमध्ये साठलेली जुनी माहिती सक्रिय केली असेल. ही प्रक्रिया नेहमी जाणीवपूर्वक होत नाही.

काही संशोधकांच्या मते जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांच्या खूप जवळ असतात. (उदा. मित्र, पती-पत्नी किंवा कुटुंबातील व्यक्ती) 

तेव्हा त्यांच्यातील मानसिक पातळीवरील संवाद अधिक तीव्र होतो. त्यामुळे त्यांची स्पंदने एकमेकांकडे पोहचतात का हा संशोधनाचा एक महत्त्वाचा विषय आहे.

म्हणून “मला अचानक त्याची आठवण आली” याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीकडून खरोखर काही संदेश आपल्या मनाला मिळाला आहे.


मग त्याच वेळी फोन कसा येतो?

अनेकवेळा असे घडले की योगायोग झाला अशी शक्यता असते. कारण तुम्ही एखाद्याचा विचार केला आणि थोड्या वेळाने त्याचा फोन आला. 

जेव्हा दोन्ही घटना एकामागोमाग घडतात तेव्हा मेंदू त्यांच्यात संबंध शोधतो.

विचार → फोन

असा संबंध आपल्याला दिसतो.

पण प्रत्यक्षात फोन येण्याचे कारण कदाचित त्या व्यक्तीने आधीच तुम्हाला फोन करण्याचे ठरवलेले असू शकते. आणि तुम्हाला त्याची काहीच कल्पना नसते.

आणि तुमच्या मनात त्याची आठवण त्याच वेळेत येणे हा योगायोग असू शकतो. 

असे असले तरी "मी आठवण काढली आणि त्याचा संपर्क झाला किंवा फोन आला" असे अनुभव अनेकजण सांगतात.


विज्ञान काय सांगते?


मेंदू सतत माहितीतील नमुने शोधत असतो

मानवी मेंदूची एक महत्त्वाची क्षमता म्हणजे Pattern Recognition म्हणजे विविध घटनांमध्ये संबंध किंवा नमुना शोधणे.

आपल्या आजूबाजूला हजारो घटना घडतात. त्यापैकी काही घटना एकमेकांशी जुळतात.

उदाहरणार्थ:

  • एखाद्याची आठवण येते आणि त्याचा फोन येतो.
  • एखाद्या व्यक्तीचा विचार करतो आणि दुसऱ्या दिवशी ती भेटते.
  • एखाद्या विषयाचा विचार आपल्या मनात करतो आणि लगेच त्यासंबंधित माहिती सोशल मीडियावर दिसते.

अशा अनेक घटना आपल्याला विशेष वाटतात कारण त्या आपल्या विचारांशी जुळलेल्या असतात. परंतु प्रत्येक वेळी असा संबंध निर्माण होत नाही.

विज्ञान कोणत्याही चमत्कारांपेक्षा पुरावे आणि तथ्यांवर विश्ृ


Confirmation Bias ची भूमिका

मानसशास्त्रात Confirmation Bias म्हणजे आपल्या आधीच्या कल्पनेला पुष्टी देणाऱ्या घटनांकडे अधिक लक्ष देण्याची प्रवृत्ती.

समजा, तुम्हाला एका महिन्यात एखाद्या व्यक्तीची 20 वेळा आठवण झाली.

त्यापैकी:

  • 17 वेळा फोन आला नाही.
  • 2 वेळा काही तासांनंतर फोन आला.
  • 1 वेळा लगेच फोन आला.

तुमच्या लक्षात सर्वाधिक कोणती घटना राहील? बहुधा लगेच फोन आलेली घटना. कारण ती विलक्षण आणि लक्षात राहण्यासारखी आहे.

यामुळे नंतर आपल्याला असे वाटू शकते की, “मी त्याचा विचार केला की त्याचा फोन येतो.”


योगायोगाची शक्यता कमी समजू नका

आपल्या आयुष्यात रोज असंख्य विचार येतात.

आपण अनेक लोकांचा विचार करतो. अनेक गोष्टी आठवतात. त्याच वेळी इतर लोकही आपापल्या आयुष्यातील घटनांमुळे आपल्याशी संपर्क साधत असतात.

त्यामुळे काही वेळा दोन स्वतंत्र घटना एकाच वेळी घडणे अपरिहार्यपणे शक्य आहे.

याला Coincidence म्हणजे योगायोग म्हणता येईल.

योगायोग म्हणजे घटना अर्थहीन आहेत असे नाही; फक्त त्या एकमेकांना कारणीभूत आहेत असे सिद्ध झालेले नसते.


मानसशास्त्र काय सांगते?


भावनिक नात्यामुळे आठवणी अधिक सक्रिय होऊ शकतात

ज्या व्यक्तीशी आपले जवळचे नाते असते, तिच्याशी संबंधित आठवणी आपल्या मनात अधिक खोलवर असू शकतात.

उदाहरणार्थ:

  • आई-वडील
  • भाऊ-बहीण
  • जवळचा मित्र
  • जीवनसाथी
  • जुना सहकारी
  • एखादी विशेष व्यक्ती

या व्यक्तींशी संबंधित असंख्य अनुभव आपल्या स्मरणात असतात. त्यामुळे त्यांच्या आठवणी सहज सक्रिय होऊ शकतात.


अवचेतन मन काही संकेत आधी पकडू शकते का?

आपला मेंदू अनेक माहितीची प्रक्रिया आपण जाणीवपूर्वक लक्ष देण्यापूर्वीच करतो.

उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती नेहमी रात्री 8 वाजता फोन करत असेल, तर आपल्याला त्याची जाणीव नसली तरी त्या वेळेशी संबंधित अपेक्षा मनात तयार झालेली असू शकते.

एखाद्या दिवशी 7:55 वाजता त्या व्यक्तीची आठवण येते आणि 8 वाजता फोन येतो.

आपल्याला हे Sixth Sense वाटू शकते.

पण त्यामागे पूर्वीच्या अनुभवांवर आधारित अवचेतन अपेक्षा किंवा pattern recognition असण्याची शक्यता आहे.


अध्यात्म काय सांगते?

अध्यात्मिक परंपरांमध्ये मन आणि व्यक्तींमधील सूक्ष्म संबंधांविषयीचे वेगवेगळे मतप्रवाह आढळतात.

अध्यात्मिक ग्रंथानुसार आणि जाणकारांच्या मते प्रत्येक जीवाची एक ऊर्जा (Energy Field / Aura) असतो.

अध्यात्मिक दृष्टीकोनातून असे मानले जाते की, जेव्हा दोन व्यक्तींचे आत्मे किंवा मने एका विशिष्ट पातळीवर जोडलेली असतात, त्यावेळी त्यांच्यामध्ये अंतराचे बंधन उरत नाही. 

यालाच टेलिपॅथी (Telepathy) किंवा उच्च दर्जाचे अंतर्ज्ञान (Sixth Sense) म्हटले जाते. 

काही लोकांच्या मते दोन व्यक्तींमध्ये खूप मजबूत भावनिक किंवा मानसिक संबंध असल्यास एकाला दुसऱ्याची अचानक (आठवण) जाणीव होऊ शकते.

जेव्हा तुमची अंतर्ज्ञानाची शक्ती (sixth sense) जबरदस्त असते, तेव्हा तुम्हाला भविष्यात घडणाऱ्या घटनांचे किंवा एखाद्या व्यक्तीच्या कृतीची आधीच जाणीव होऊ लागते. याला ईश्वरी संकेत किंवा वैश्विक उर्जेचे एक रूप मानले जाते.

काहीजण याला अंतर्ज्ञान, तर काहीजण Sixth Sense किंवा सहावे इंद्रिय असे म्हणतात.

टेलिपॅथी (Telepathy) सोप्या भाषेत सांगायचे तर एका व्यक्तीच्या मनातील माहिती दुसऱ्या व्यक्तीपर्यंत कोणत्याही सामान्य संवाद माध्यमाशिवाय पोहोचणे.

असे असले तरी येथे सावधगिरी महत्त्वाची आहे कारण...

Telepathy किंवा Sixth Sense मुळे फोन येतो, हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाही.

त्यामुळे अध्यात्मिक अनुभवांचा आदर ठेवतानाच त्यांना वैज्ञानिक तथ्य म्हणून मांडणे हे योग्य ठरणार नाही.


वास्तविक उदाहरणे

उदाहरण 1: जुना मित्र

तुम्ही घरामध्ये निवांत बसलेले असता. अचानकपणे कॉलेजमधील एका मित्राची आठवण येते.

तुमच्या मनात विचार येतो की, आपण त्याच्याशी बोलायला हवे. आणि काही मिनिटांनी त्याचाच फोन येतो.

ही घटना खरोखर आश्चर्यकारक आहे.

परंतु कदाचित त्या मित्रानेही त्याच दिवशी एखादी जुनी आठवण आली म्हणून तुम्हाला फोन करण्याचा विचार केला असेल.


उदाहरण 2: कुटुंबातील व्यक्ती

आई दुसऱ्या शहरात आहे. अचानक तिची आठवण येते आणि थोड्याच वेळात तिचा फोन येतो.

येथे भावनिक नात्यामुळे हा अनुभव अधिक तीव्र वाटू शकतो. आपण अशा घटना सहज विसरत नाही.


उदाहरण 3: फोन न आलेल्या घटना

समजा एखाद्या दिवशी तुम्हाला दिवसभरात अनेक लोकांची आठवण आली.

परंतु त्यापैकी कोणाचाच फोन आला नाही. या घटना तुम्ही कदाचित लक्षात ठेवणार नाही.

त्यानंतर म्हणजे बऱ्याच वेळाने एखाद्याची आठवण आली आणि लगेच फोन आला, तर ती घटना मात्र कायम लक्षात राहू शकते.


Myth vs Fact

गैरसमज (Myth) वास्तव (Fact)
एखाद्याची आठवण आली आणि फोन आला म्हणजे Sixth Sense सिद्ध झाला.

अशा प्रकारची घटना घडणे हे Sixth Sense सिद्ध करण्यासाठी पुरेशी नाही.
आपण कोणाचा विचार केला की त्या व्यक्तीलाही आपली आठवण येते. काही वेळा असे जुळू शकते;
पण त्याचा थेट वैज्ञानिक पुरावा नाही.
Telepathy सिद्ध झाली आहे.
Telepathy बाबत संशोधन झाले असले तरी ती सर्वमान्य वैज्ञानिक वस्तुस्थिती म्हणून स्थापित झालेली नाही.
अशा घटना नेहमीच अद्भूत आणि अलौकिक अशा असतात.
योगायोग, मानसशास्त्र आणि मेंदूची कार्यपद्धती यामुळेही त्यांचे स्पष्टीकरण होऊ शकते.

अशा अनुभवांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करावे. अनुभव नोंदवून त्यातील pattern पाहणे अधिक योग्य

तुम्हाला माहिती आहे का?

आपल्या लक्षात राहणारे योगायोग आणि प्रत्यक्षात घडणारे सर्व योगायोग हे एकसारखे नसतात.

मानवी मेंदूमध्ये सुमारे ८६ अब्ज न्यूरान्स असतात, ते सतत विद्युत लहरी (Electrical Impulses) तयार करत असतात. 

मेंदूची ही ऊर्जा आणि तिचे तरंग कधी कधी आपत्कालीन किंवा भावनिक संपर्कावर कसा प्रभाव पाडतात. यावर आजही जगभरात न्यूरोसायन्सचे संशोधन सुरू आहे.

एखादी घटना आपल्या भावनांशी किंवा अपेक्षांशी जुळली तर ती आठवण अधिक मजबूत होऊ शकते.

त्यामुळेच एखादी व्यक्ती आठवली आणि लगेच तिचा फोन आला, तर तो अनुभव आपल्याला खूप विशेष वाटतो.

जर तुम्हाला अशा घटनांचे वस्तुनिष्ठ निरीक्षण करायचे असेल, तर पुढच्या वेळी आठवण आल्यावर तारीख, वेळ, व्यक्ती आणि त्यानंतर काय घडले याची नोंद करून ठेवा.

अशी नोंद ठेवल्यास आपल्याला स्वतःच्या अनुभवाकडे अधिक स्पष्टपणे पाहता येऊ शकते.


महत्त्वाचे मुद्दे 

  • एखादी व्यक्ती अचानक आठवणे ही सामान्य मानसिक प्रक्रिया असू शकते.
  • एखाद्याची आठवण आल्यावर फोन येणे हा अनुभव गुढ वाटणारा वाटतो.
  • यामागे योगायोग, मानवी मेंदूची कार्यपद्धती आणि मानसशास्र यांचा मोठा वाटा असतो 
  • आठवणी अनेकवेळा बाह्य संकेत किंवा अवचेतन मनातील प्रक्रियांमुळे सक्रिय होतात.
  • नेमकी त्याच व्यक्तीचा लगेच फोन येणे हा योगायोग असू शकतो.
  • Pattern Recognition आणि Confirmation Bias अशा अनुभवांवर प्रभाव टाकू शकतात.
  • भावनिकदृष्ट्या जवळच्या व्यक्तींशी संबंधित घटना आपल्याला अधिक तीव्र वाटू शकतात.
  • काही लोक अशा अनुभवांना Sixth Sense किंवा अंतर्ज्ञानाशी जोडतात.
  • Telepathy किंवा Sixth Sense यांना अशा घटनांचे निश्चित वैज्ञानिक स्पष्टीकरण मानण्यासाठी पुरेसा पुरावा उपलब्ध नाही.
  • अनुभव नाकारण्याऐवजी त्याकडे कुतूहल आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या दोन्ही बाजूंनी पाहणे योग्य आहे.

निष्कर्ष

शेवटी असे म्हणता येईल की, "एखादी व्यक्ती आठवली आणि तिचा फोन आला" या घटनेकडे पाहण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. 

एखादी व्यक्ती आठवली आणि लगेच फोन आला, हा अनुभव नक्कीच विलक्षण वाटू शकतो.

कधी त्यामागे साधा योगायोग असू शकतो, तर कधी आपल्या मेंदूने नकळत ओळखलेले patterns, भावनिक आठवणी असू शकतात.

दुसरीकडे, अध्यात्मिक दृष्टिकोनातून काही लोक अशा अनुभवांना Sixth Sense, अंतर्ज्ञान किंवा सूक्ष्म मानसिक संबंध मानतात.

विज्ञान याला योगायोग आणि मेंदूचा खेळ मानते. तर अध्यात्म याला उच्च दर्जाची ऊर्जा किंवा सिक्स्थ सेन्स ची कमाल मानते.

मानवी मन आणि निसर्ग यांच्यातील अनेक रहस्ये अद्याप पूर्णपणे उलगडलेले नाही.

मात्र आजच्या उपलब्ध वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारावर “एखाद्याची आठवण आली म्हणून त्या व्यक्तीने आपल्याला फोन केला” किंवा “हा Sixth Sense चा निश्चित पुरावा आहे” असे ठामपणे म्हणणे योग्य ठरणार नाही.

थोडक्यात सांगायचे तर...

हा योगायोग असू शकतो, मानसशास्त्रीय प्रक्रियेचा परिणाम असू शकतो किंवा आपल्या समजुतीपेक्षा अधिक गुंतागुंतीचा अनुभव असू शकतो; पण त्याला लगेच अलौकिक किंवा अद्भूत घटना मानण्याची गरज नाही.

पुढच्या वेळी अशी घटना घडली तर फक्त आश्चर्यचकित होऊ नका...ती नोंदवून ठेवा, निरीक्षण करा आणि स्वतःच त्यामधील pattern शोधण्याचा प्रयत्न करा.



FAQ

1. एखादी व्यक्ती आठवली आणि लगेच तिचा फोन आला, असे का होते?

यामागे योगायोग, आठवणी सक्रिय होणे, भावनिक संबंध, किंवा मेंदूची pattern recognition यांसारखी अनेक कारणे असू शकतात.

2. हा सिक्स्थ सेन्स चार भाग आहे का?

अनेक लोकांचा आणि अध्यात्मिक अभ्यासकांचा असा विश्वास आहे की, हा अंतर्ज्ञान किंवा 'सिक्स्थ सेन्स' चार एक भाग असू शकतो, पण त्याला वैज्ञानिक मान्यता नाही.

3. एखाद्याचा विचार केल्यावर त्यालाही आपली आठवण येते का?

कधी कधी दोन व्यक्तींच्या विचारांमध्ये योगायोगाने साम्य येऊ शकते. परंतु एका व्यक्तीचा विचार हा थेट दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो, असे अजून वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाही.

4. एखाद्याची आठवण येणे म्हणजे Sixth Sense आहे का?

आठवण येणे म्हणजे स्वतःमध्ये Sixth Sense चे प्रमाण नाही. काही लोक अशा अनुभवांना Sixth Sense शी जोडतात; मात्र वैज्ञानिकदृष्ट्या त्याचे निश्चित समर्थन उपलब्ध नाही.

5. Telepathy म्हणजे काय?

Telepathy म्हणजे कोणत्याही सामान्य संवाद माध्यमाचा वापर न करता एका व्यक्तीच्या मनातील विचार किंवा माहिती दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे, अशी सामान्य संकल्पना आहे. मात्र तिच्या अस्तित्वाबाबत वैज्ञानिकांमध्ये एकमत नाही.

6. अशा योगायोगांच्या घटना आपल्याला इतक्या लक्षात का राहतात?

कारण आपल्या भावनांशी जुळणाऱ्या किंवा आश्चर्यकारक गोष्टी अधिक लक्षात राहतात. न जुळलेल्या अनेक घटना आपण सहज विसरल्या जातात.

7. अवचेतन मनाला काही गोष्टी आधीच कळतात का?

अवचेतन मानसिक प्रक्रिया आपल्या लक्षात न आलेली माहिती आणि पूर्वीचे अनुभव वापरू शकते. त्यामुळे काही निर्णय किंवा भावना अचानक निर्माण झाल्यासारख्या वाटू शकतात. मात्र याला भविष्याची अचूक जाणीव असे म्हणता येत नाही.

8. अशा अनुभवाची सत्यता तपासता येते का?

तर हो. तारीख, वेळ, कोणाची आठवण आली आणि नंतर फोन आला की नाही याची नियमित नोंद ठेवता येते. दीर्घकाळ नोंदी केल्यास अनुभवातील वास्तविक pattern अधिक स्पष्ट होऊ शकतो.


संबंधित लेख (Related Articles)

सहावे इंद्रिय म्हणजे काय? विज्ञान, मानसशास्त्र आणि अनुभवांच्या आधारे संपूर्ण माहिती

https://www.sixthsensemarathi.com/2026/08/sahave-indriya-mhanje-kay.html

सहावे इंद्रिय जागृत करण्याचे 7 प्रभावी मार्ग

https://sixthsensemarathi.blogspot.com/2026/07/7.html

डेजा व्हू म्हणजे काय? ही लक्षणे तपासा

https://sixthsensemarathi.blogspot.com/2026/07/deja-vu.html

तुम्हाला Sixth Sense आहे का? ही 10 लक्षणे तपासा https://sixthsensemarathi.blogspot.com/2026/07/sixth-sense-10.html

अचानक अस्वस्थ वाटणे! हा Sixth Sense संकेत असू शकतो 

https://www.sixthsensemarathi.com/2026/08/sixth-sense-sudden-uncomfortable.html_

_____________________________________________

युट्यूब चॅनल- Sixth Sense Power 

https://youtube.com/@sixthsensepower


विश्वासार्ह संदर्भ (References)

  1. American Psychological Association (APA) – Memory, cognition आणि cognitive biases संदर्भातील मानसशास्त्रीय माहिती.

  2. American Psychological Association – Dictionary of Psychology – Confirmation Bias आणि संबंधित मानसशास्त्रीय संकल्पनांसाठी.

  3. Kahneman, D. – Thinking, Fast and Slow
    मानवी विचारप्रक्रिया, निर्णयक्षमता आणि cognitive biases समजून घेण्यासाठी उपयुक्त संदर्भ.

  4. Nickerson, R. S. (1998). Confirmation Bias: A Ubiquitous Phenomenon in Many Guises.
    Review of General Psychology, 2(2), 175–220.

  5. भारतीय अध्यात्म आणि अंतर्ज्ञान विषयक ग्रंथ 

  6. National Institute of Mental Health (NIMH) – मानवी मेंदू, मानसिक प्रक्रिया आणि मानसशास्त्रीय आरोग्याबाबत माहिती.
    https://www.nimh.nih.gov/

टीप: Sixth Sense, intuition आणि telepathy यांसारख्या संकल्पनांबाबत वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टीकोन वेगळे आहेत. म्हणून या लेखात सिद्ध झालेली वैज्ञानिक माहिती आणि वैयक्तिक/आध्यात्मिक समजुती यांच्यात स्पष्ट फरक ठेवण्यात आला आहे.


तुमचे मत काय?

तुमच्यासोबतही कधी असे झाले आहे का की, एखादी व्यक्ती अचानक आठवली आणि काही क्षणांतच तिचा फोन आला?

तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. तो योगायोग होता असे तुम्हाला वाटते की Sixth Sense?

अशाच Sixth Sense, मानसशास्त्र, स्वप्ने आणि रहस्यमय मानवी अनुभवांमागील विज्ञान समजून घेण्यासाठी Sixth Sense Marathi वरील पुढील लेख नक्की वाचा. ____________________________________________

लेखक: Prof. Dr. Sanjay Jadhav

Founder – Sixth Sense Marathi

(संशोधन, मानसशास्त्र, स्वप्नशास्र, अंतर्ज्ञान आणि सहावे इंद्रिय या विषयांवर माहितीपूर्ण लेखन)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रात्री 3 वाजता जाग का येते?

झोपेत अचानक पडल्यासारखे का वाटते? | Hypnic Jerk म्हणजे काय?

साप स्वप्नात दिसणे शुभ की अशुभ? स्वप्नशास्त्र, मानसशास्त्र आणि विज्ञान काय सांगते?