टेलिपॅथी (Telepathy) म्हणजे काय? दुसऱ्याच्या मनातील विचार ओळखणे शक्य आहे का?

Telepathy meaning in Marathi – दोन व्यक्तींमधील विचारांची देवाणघेवाण आणि टेलिपॅथीची संकल्पना दर्शवणारे चित्र

तुमच्या बाबतीत कधी असं झालं आहे का?
 तुम्ही एखाद्या जवळच्या व्यक्तीचा विचार करत असता आणि नेमका त्याच क्षणी तिचा फोन येतो किंवा त्या व्यक्तीचा तुम्हाला मेसेज येतो. 

एखाद्या मित्राला काहीतरी सांगायचे असते आणि तोच विषय तो अचानक तुमच्यासमोर काढतो. किंवा बऱ्याचदा दोन व्यक्तींच्या मनात अगदी एकाच वेळेला तोच शब्द येतो. आपण याला योगायोग म्हणून सोडून देतो. 

आईला आपला मुलगा काही न सांगताही त्याच्या मनात काहीतरी बिनसल्याची जाणीव होते. पण तुम्हाला कधी प्रश्न पडलाय का की, हे असं का घडतं? असे अनुभव आल्यानंतर आपल्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की, “आपण खरंच दुसऱ्याच्या मनातील विचार जाणू शकतो का?”

मानवी मन आणि मेंदूची ही एक अशी अनाकलनीय बाजू आहे, जिला आपण टेलिपॅथी (Telepathy) किंवा मनाचा संवाद म्हणतो.

अशा प्रकारे टेलीपॅथीची संकल्पना निर्माण झाली आहे.

काही लोक टेलिपॅथीचा संबंध सहाव्या इंद्रियाशी जोडतात, तर काही जण यामागे मेंदूची कार्यपद्धती, निरीक्षणशक्ती, अनुभव आणि मानसशास्त्रीय प्रक्रिया असल्याचे मानतात.

विज्ञान याला अजून पूर्णपणे मान्यता देत नसले , तरी मानवाच्या इतिहासात आणि अनुभवांच्या जगात टेलिपॅथीने माणसाला नेहमीच अचंबित केले आहे.


विषयाची ओळख

टेलिपॅथी (Telepathy) हा शब्द ग्रीक भाषेतील 'Tele' (दूर) आणि 'Patheia' (भावना किंवा अनुभूती) या दोन शब्दांपासून बनला आहे. 

याचा सोपा अर्थ म्हणजे कोणत्याही पारंपरिक संवाद माध्यमाचा वापर न करता एका व्यक्तीच्या मनातील विचार, भावना किंवा मानसिक माहिती दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचणे किंवा ती व्यक्ती ती माहिती जाणणे. 

थोडक्यात आणि सोप्या भाषेत सांगायचे झाले तर—

“एका मनातून दुसऱ्या मनापर्यंत संदेश जाणे” अशी टेलिपॅथीची कल्पना आहे.

यामध्ये बोलणे, लिहिणे, फोन, मेसेज किंवा स्पष्ट शारीरिक संकेत यांचा वापर होत नाही, असे मानले जाते.

शतकानुशतके हा विषय कुतुहलाचा राहिलेला आहे.  काहींसाठी हा दैवी गुण, किंवा मानसिक शक्तीचा भाग आहे तर काहींसाठी हा मानवी मेंदूचा भास किंवा निव्वळ योगायोग आहे.

टेलिपॅथीचा उल्लेख प्रामुख्याने Parapsychology म्हणजेच परामनोविज्ञानाच्या अभ्यासात आढळतो. मात्र या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे, ती म्हणजे -

आजच्या मुख्य प्रवाहाचा विचार केला तर, विज्ञानाने मानवी विचार थेट एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे टेलिपॅथीद्वारे जातात, हे निश्चितपणे सिद्ध केलेले नाही.

आजच्या लेखामध्ये आपण टेलिपॅथी म्हणजे काय? आणि दुसऱ्याच्या मनातील विचार ओळखणे खरोखर शक्य आहे का? यावर विज्ञान, मानसशास्त्र आणि अध्यात्म या दृष्टिकोनातून सविस्तर जाणून घेऊया.


टेलिपॅथी म्हणजे नेमके काय? 

टेलिपॅथी ही अशी एक संकल्पना आहे की जिथे दोन मनं (Minds) कितीही अंतरावर किंवा दूर असले तरी एकमेकांशी संवाद साधतात. यामध्ये ना आवाज असतो, ना इशारे! तरीही थेट विचारांची देवाणघेवाण होते असा दावा केला जातो. 

पूर्वी दळणवळणाची कोणतीही साधनं नव्हती, तेव्हा ऋषी-मुनी किंवा दूरवर राहणारे लोक एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी अशा पध्दती वापरत असत असे मानले जाते.

टेलिपॅथी कशी कार्य करते 

टेलिपॅथी समर्थकांच्या मते, विचार किंवा मानसिक अवस्था एखाद्या सूक्ष्म माहितीच्या स्वरूपात दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकते.

टेलिपॅथीमध्ये साधारणपणे दोन व्यक्तींची कल्पना केली जाते..

Sender – संदेश पाठवणारी व्यक्ती

आणि

Receiver – संदेश ग्रहण करणारी व्यक्ती

उदाहरणार्थ, एका व्यक्तीने मनात लाल रंगाच्या गुलाबाची  कल्पना केली आणि दुसऱ्या व्यक्तीने कोणत्याही स्पष्ट संकेताशिवाय “गुलाब” किंवा “फूल” असा अंदाज व्यक्त केला, तर टेलिपॅथीच्या प्रयोगात अशा प्रकारच्या घटनांचा अभ्यास केला जाऊ शकतो.

परंतु अशा प्रयोग करताना योग्य नियंत्रण, सांख्यिकीय विश्लेषण आणि पुनरावृत्ती अत्यंत महत्त्वाची असते. 

कारण फक्त एखादा अंदाज बरोबर आला म्हणून तो टेलिपॅथीचा पुरावा ठरत नाही.

टेलिपॅथीचे प्रकार

काही संशोधकांच्या मतानुसार, टेलिपॅथीचे दोन प्रकार असू शकतात. 

भावनिक टेलिपॅथी (Imotional Telepathy) 

आपल्या खूप जवळची किंवा प्रिय असलेल्या व्यक्तीला त्रास होत असेल किंवा संकटात असेल तर आपल्याला अचानक ती अस्वस्थता जाणवते.

वैचारिक टेलिपॅथी (Mental Telepathy) 

यामध्ये समोरच्या व्यक्तीच्या मनात नेमका कोणता विचार चालला आहे किंवा ती काय बोलणार आहे याचा अचूक अंदाज बांधणे.


विज्ञान काय सांगते?

Telepathy meaning in Marathi – टेलिपॅथी आणि मेंदूतील विचारांच्या देवाणघेवाणीवरील वैज्ञानिक संशोधनाचे चित्र

टेलिपॅथीबाबत विज्ञानाची भूमिका मात्र अत्यंत सावध आहे. आजवरच्या विज्ञान आणि न्यूरोसायन्सच्या (Neuroscience) मते टेलिपॅथी हा एक सिद्ध झालेला वैज्ञानिक नियम नाही.

मानवी मेंदूमध्ये विद्युत आणि रासायनिक प्रक्रिया घडतात. मेंदू विद्युत क्रियाशीलता निर्माण करतो आणि ती EEG सारख्या उपकरणांनी मोजता येते. 

परंतु याचा अर्थ असा होत नाही की एखाद्या व्यक्तीच्या मनातील विशिष्ट विचार दुसऱ्या व्यक्तीच्या मेंदूपर्यंत नैसर्गिकपणे संदेशाच्या स्वरूपात पोहोचतो.

आजपर्यंत टेलिपॅथी अस्तित्वात असल्याचे सर्वमान्य असे वैज्ञानिक प्रमाण उपलब्ध नाही.

तरीही या विषयावर अनेक प्रयोग आणि संशोधन झाले आहे.

उदाहरणार्थ, Ganzfeld experiments या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रयोगांमध्ये एका व्यक्तीने माहिती पाठवण्याचा प्रयत्न करणे आणि दुसऱ्या व्यक्तीने ती माहिती ग्रहण करण्याचा प्रयत्न करणे, अशा पद्धतींचा अभ्यास करण्यात आला.

काही संशोधकांनी अशा प्रयोगांमध्ये योगायोगापेक्षाही जास्त अचूक परिणाम मिळाल्याचे सुचवले. परंतु या निष्कर्षांवर चुका, प्रयोगांची पुनरावृत्ती, सांख्यिकीय विश्लेषण आणि पूर्वग्रह यांसंबंधी चर्चा झाली आहे.

1999 मध्ये Milton आणि Wiseman यांनी Ganzfeld संशोधनाच्या परिणामांचे meta-analysis केले आणि टेलिपॅथीच्या दाव्यांसाठी ठोस निष्कर्ष काढण्यास पुरेसा पुरावा नसल्याचे मत नोंदवले.

अमेरिकेतील 'पेरॅनॉर्मल रिसर्च' आणि काही विशिष्ट प्रयोगशाळांमध्ये यावर संशोधन झाले आहे. काही संशोधनानुसार, क्वांटम फिजिक्समधील 'क्वांटम एन्टाग्लमेंट' (Quantum Entanglement) हा सिद्धांत मानवी मनाच्या अशा अनाकलनीय घटना समजून घेण्यासाठी भविष्यात महत्वाचा ठरू शकतो, असे काहींचे मत आहे. 

काही नंतरच्या संशोधकांनी parapsychological phenomena संदर्भात काही सांख्यिकीय परिणामांकडे लक्ष वेधले आहे. उदाहरणार्थ, Etzel Cardeña (2018) यांनी American Psychologist मध्ये parapsychological phenomena वरील संशोधनाचा आढावा घेतला आहे.

यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते...

टेलिपॅथीचा विषय पूर्णपणे दुर्लक्षित केलेला नसला तरी तिचे अस्तित्व निश्चित असे वैज्ञानिक तथ्य म्हणून स्वीकारले गेलेलेही नाही.


मानसशास्त्र काय सांगते?

टेलिपॅथी आणि मानसशास्त्र – दोन व्यक्तींमधील मानसिक संपर्क, मेंदूची कार्यप्रणाली आणि विचारांची देवाणघेवाण दर्शवणारे चित्र

मानसशास्र (Psychology) टेलिपॅथीच्या घटनांकडे पूर्णपणे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहते. 

मानसशास्त्रज्ञांच्या मते आपण ज्या गोष्टीला टेलिपॅथी समजतो, त्यामागे बरेचदा मानवी मेंदूची सूक्ष्म निरीक्षण क्षमता आणि अचेतन मन (Subconscious Mind) काम करत असते. 

आपल्याला एखाद्याचे विचार समजल्यासारखे का वाटते? याचे उत्तर अनेकदा मानसशास्त्रामध्ये सापडू शकते.

1. जवळच्या व्यक्तीचे निरीक्षण

आपण एखाद्या व्यक्तीसोबत अनेक वर्षे राहतो तेव्हा, तिच्या बोलण्याची पद्धत, चेहऱ्यावरील भाव, आवाजातील बदल आणि वर्तनामधील सूक्ष्म फरक आपल्याला कळू लागतात.

आणि म्हणूनच ती व्यक्ती काही न बोलताही तिच्या मनःस्थितीचा अंदाज येऊ शकतो. हे टेलिपॅथीपेक्षा सूक्ष्म निरीक्षणशक्ती असू शकते.

2. Confirmation Bias

आपल्या मनाला बरोबर ठरलेल्या गोष्टींचे अनुभव लक्षात राहतात.

समजा तुम्ही एखाद्या मित्राचा विचार केला आणि त्याच दिवशी त्याचा फोन आला. हा अनुभव तुम्हाला लगेच आठवतो आणि लक्षात राहतो.

परंतु तुम्ही शंभर वेळा एखाद्याचा विचार केला आणि त्याचा जर फोन आला नाही, तर हे अनुभव तितकेसे लक्षात राहत नाहीत.

यालाच Confirmation Bias शी संबंधित मानसिक प्रक्रिया म्हणता येते.

3. निवडक आठवण

मानवी स्मरणशक्ती ही परिपूर्ण नसते. एखादी घटना घडल्यानंतर आपण तिची आठवण पुन्हा तयार करताना काही तपशीलात बदल होऊ शकतो.

त्यामुळे “मला आधीच त्याचा फोन येणार आहे असे जाणवले होते” हा अनुभव खरा वाटू शकतो; परंतु त्यामागे अमुक एक अचूक मानसिक संदेश होता असेही सिद्ध होत नाही.

4. समान परिस्थिती

जर दोन व्यक्ती एकाच परिस्थितीत असतील तर त्यांना समान विचार येण्याची शक्यता असते.

उदाहरणार्थ, दोघेही एकाच परीक्षेची तयारी करत असतील तर दोघांनाही त्याच विषयाची चिंता असू शकते. यासाठी टेलिपॅथीची आवश्यकता नसते.

टेलिपॅथी आणि अध्यात्म 

टेलिपॅथी आणि अध्यात्म – ध्यान, मानवी चेतना आणि दोन व्यक्तींमधील मानसिक संपर्काची संकल्पना दर्शवणारे चित्र

भारतीय संस्कृतीत अध्यात्म (Spirituality) आणि  टेलिपॅथीला खूप जुनी आणि महत्वाची किनार आहे. आपले प्राचीन ग्रंथामध्ये, योगासनांमध्ये आणि वेदांमध्ये मनाच्या व्यक्तीबद्दल अफाट असा विस्तार सांगितला आहे.

अध्यात्मात मन, चेतना, ऊर्जा आणि व्यक्तींमधील सूक्ष्म संबंध यांना महत्त्व दिले जाते.

काही आध्यात्मिक परंपरांमध्ये अत्यंत विकसित ध्यान, एकाग्रता किंवा चेतनेच्या अवस्थेमुळे दुसऱ्या व्यक्तीच्या भावना किंवा विचारांची जाणीव होऊ शकते, असा विश्वास आढळतो.

काही लोक मात्र अशा अनुभवांना सूक्ष्म संवाद, मानसिक संदेश किंवा सहावे इंद्रिय यांच्याशी जोडतात.

मात्र येथे विज्ञान आणि अध्यात्म यांच्यातील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे.

अध्यात्मिक गुरूंच्या मतानुसार, जेव्हा कोणतीही व्यक्ती ध्यान (Meditation) किंवा योग साधनेच्या माध्यमातून आपल्या मनाला पूर्णपणे शांत करते तेव्हा तिची मानसिक ऊर्जा (Mental Energy) खूप वाढते. आणि ही वाढलेली ऊर्जा एका पातळीवरून दुसऱ्या पातळीवर संपर्क साधण्यासाठी सक्षम असते.

जुन्या काळातील ऋषी-मुनी आपल्या 'संकल्प शक्तीच्या मदतीने दुरवर असलेल्या शिष्यांशी संवाद साधत असत, असा उल्लेख पुराणात आढळतो. 

जेव्हा दोन व्यक्तींचे मन किंवा आत्मे एकाच अध्यात्मिक वारंवार तेवर (Frequency पेक्षाही सूक्ष्म पातळीवर) जोडले जातात. तेव्हा विचारांची देवाणघेवाण शक्य होते, असा दृढ विश्वास अध्यात्म मानते. 

आध्यात्मिक अनुभव एखाद्या व्यक्तीसाठी अर्थपूर्ण असू शकतो; परंतु तो वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला तथ्य आहे असे आपोआप म्हणता येत नाही.

म्हणून टेलिपॅथीबाबत “हे निश्चितपणे खरे आहे” किंवा “हे पूर्णपणे अशक्य आहे” असे टोकाचे विधान करण्याऐवजी उपलब्ध पुराव्यांकडे चिकित्सकपणे पाहणे अधिक योग्य आहे.


वास्तविक जीवनातील उदाहरणे

उदाहरण 1: अचानक फोन येणे

तुम्हाला अचानक जुन्या मित्राची आठवण येते आणि काही वेळाने त्याचा फोन येतो.

हा अनुभव नक्कीच आश्चर्यकारक वाटू शकतो.

पण तुमच्या मनात त्या मित्राची आठवण येण्याची अनेक कारणे असू शकतात—एखादी जुनी घटना, फोटो, सोशल मीडिया पोस्ट किंवा पूर्वीचा संवाद.

उदाहरण 2: आईला मुलाची चिंता जाणवणे

आईला मुलगा ठीक नसल्याची जाणीव होते आणि नंतर मुलगा फोन करून अडचण सांगतो.

हे टेलिपॅथी आहे असे लगेच म्हणता येणार नाही.

आईला मुलाच्या आवाजातील, वागण्यातील किंवा दिनक्रमातील अनेक सूक्ष्म गोष्टींची दीर्घकाळाची ओळख असू शकते.

उदाहरण 3: दोन मित्रांना एकच कल्पना सुचणे

दोन मित्रांना एकाच वेळी समान कल्पना सुचणे आणि विचारांची देवाणघेवाण दर्शवणारे चित्र

दोन मित्र एखाद्या विषयावर चर्चा करत असताना दोघांना एकाच वेळी समान कल्पना सुचते.

याला टेलिपॅथी मानण्यापूर्वी त्यांच्या समान अनुभवांचा, आवडींचा आणि आधी झालेल्या चर्चेचा विचार करणे आवश्यक आहे.


Myth vs Fact

गैरसमज वस्तुस्थिती
टेलिपॅथी सिद्ध झालेली वैज्ञानिक क्षमता आहे. सध्या सर्वमान्य वैज्ञानिक तथ्य म्हणून सिद्ध झालेले नाही.
मनात एखाद्याचा विचार केला की त्याला ते कळते टेलिपॅथीच्या दृष्टीकोनातून विश्वसनीय असा वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही.
ध्यान केल्याने कोणाचेही विचार वाचता येतात. ध्यान एकाग्रता आत्मनिरीक्षणासाठी उपयोगी ठरू शकते; विचार वाचणे क्षमता सिद्ध झालेली नाही.
जवळच्या व्यक्तीला न बोलताही समजणे म्हणजे टेलिपॅथी. निरीक्षण, अनुभव, सहानुभूती आणि मानसशास्त्रीय प्रक्रियेमुळेही असे होऊ शकते.
Telepathy आणि Mind Reading एकच आहेत.

टेलीपॅथी जादू आहे आणि सर्वांना ती जमू शकते.
दोन्ही संकल्पना संबंधित असल्या तरी “मन वाचणे” ही अधिक व्यापक
लोकप्रिय संकल्पना आहे.

ही जादू नसून मनाची सखोल एकाग्रता किंवा योगायोग असू शकतो.


तुम्हाला माहिती आहे का?

“Telepathy” हा शब्द मानसशास्त्र आणि परामनोविज्ञानाच्या इतिहासात 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात लोकप्रिय झाला.

1882 सालात स्थापन झालेल्या Society for Psychical Research ने टेलिपॅथी, भुतांचे अनुभव व इतर कथित मानसिक घटनांच्या अभ्यासाचा प्रयत्न केला. 

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, अमेरिकेने गुप्तचर मोहिमेत मनाच्या शक्तीचा आणि दूरसंचाराचा (Remote Viewing) अभ्यास करण्यासाठी काही गुप्त संशोधन प्रकल्प राबवले होते. त्याला 'प्रोजेक्ट स्टारगेट' (Project Starget) हे नाव देण्यात आले होते. परंतु त्याचे निष्कर्ष संदीग्ध असल्यामुळे तो प्रोजेक्ट गुंडाळण्यात आला.

यातून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येते की, टेलिपॅथीचा प्रश्न हा नवीन नाही. मानवी मनाला दुसऱ्याच्या मनात काय चालले आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता अनेक दशकांपासून आहे.


महत्त्वाचे मुद्दे 

  • टेलिपॅथी म्हणजे काय? तर एका व्यक्तीच्या मनातील माहिती किंवा संदेश दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पारंपरिक संवादाशिवाय पोहोचण्याची संकल्पना.
  • मानसशास्त्रानुसार सूक्ष्म निरीक्षण आणि अचेतन मनाची भूमिका यामध्ये महत्वाची असते. 
  • टेलिपॅथीचा अभ्यास प्रामुख्याने Parapsychology मध्ये केला गेला आहे.
  • अध्यात्म आणि योगशास्त्रात मनाच्या उच्च ऊर्जेमुळे हा संवाद शक्य असल्याचे मानले जाते.
  • Ganzfeld सारख्या प्रयोगांद्वारे या दाव्यांची चाचणी करण्यात आली आहे.
  • काही संशोधनांमध्ये मनोरंजक परिणाम आढळल्याचे दावे सुध्दा आहेत.
  • मात्र टेलिपॅथीचे अस्तित्व सिद्ध करणारा सर्वमान्य असा वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही.
  • एखाद्याच्या भावना किंवा विचारांचा अंदाज येणे हे निरीक्षण, अनुभव, सहानुभूती किंवा मानसशास्त्रीय प्रक्रियांमुळेही होऊ शकते.
  • अध्यात्मामध्ये टेलिपॅथीला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले जाते.
  • वैयक्तिक अनुभवाला महत्व असले तरी तो एकट्यामुळे वैज्ञानिक पुरावा ठरत नाही.

निष्कर्ष

टेलिपॅथी म्हणजे काय? याचे साधे उत्तर म्हणजे, पारंपरिक संवादाशिवाय एका व्यक्तीच्या मनातील माहिती दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची कल्पना.

काही लोकांनी आयुष्यात असे अनुभव घेतल्याचे सांगितले आहे की त्यांनी एखाद्याचा विचार केला आणि त्याच व्यक्तीचा फोन किंवा मेसेज आला, किंवा कोणीतरी काहीही न सांगता सुध्दा त्यांची मनःस्थिती ओळखली.

अशा प्रकारचे अनुभव हे दुर्लक्ष करण्यासारखे नाहीत. मात्र त्यांचा अर्थ लावताना वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक आहे.

कारण मानवी मेंदू हा अत्यंत गुंतागुंतीचा आहे. आपण चेहऱ्यावरील भाव, आवाज, वर्तन, पूर्वानुभव आणि परिस्थिती यांमधून दुसऱ्याच्या मनःस्थितीचा अंदाज अनेकदा नकळतपणे घेत असतो.

त्यामुळे प्रत्येक योगायोगाला आपण टेलिपॅथी म्हणणे योग्य नाही.

त्याचप्रमाणे, परामनोविज्ञानातील काही संशोधनांमध्ये आढळलेल्या काही चर्चित निष्कर्षांचा अभ्यास करणेही वैज्ञानिक जिज्ञासेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

आजच्या घडीला योग्य निष्कर्ष असा म्हणता येईल की, टेलिपॅथी हा विषय जितका गुढ तितकाच  तो रंजकही आहे. टेलिपॅथी ही आकर्षक आणि संशोधनाचा विषय असलेली संकल्पना आहे; मात्र ती मानवी क्षमता म्हणून निश्चितपणे सिद्ध झालेली नाही. विज्ञान आणि अध्यात्म यांच्यामध्ये या मुद्द्यावर नेहमीच मतभेद राहिलेले आहेत.

मानवी मन हे अथांग अशा समुद्रासारखे आहे, ज्याचा संपूर्ण शोध अजून लागलेला नाही. त्यामुळे हे सर्व केवळ योगायोग आहे की उच्च दर्जाची मानसिक शक्ती, यांचे उत्तर शेवटी प्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक अनुभवांवर आणि विश्वासावर अवलंबून असते.

कदाचित याच कारणामुळे टेलिपॅथी आणि Sixth Sense याबद्दलची मानवी उत्सुकता आजही कायम आहे.


FAQ (नेहमी विचारले जाणारे प्रश्न)

टेलिपॅथी म्हणजे काय – दोन व्यक्तींच्या मेंदूंमधील मानसिक संदेश आणि विचारांची देवाणघेवाण दर्शवणारे चित्र

1. टेलिपॅथी म्हणजे काय?

टेलिपॅथी म्हणजे कोणत्याही पारंपरिक संवाद माध्यमाचा वापर न करता एका व्यक्तीच्या मनातील विचार, भावना किंवा माहिती दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याची संकल्पना.

2. टेलिपॅथी वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाली आहे का?

सध्याचा विचार करता अजून तरी टेलिपॅथीचे अस्तित्व सर्वमान्य वैज्ञानिक तथ्य म्हणून सिद्ध झालेले नाही. या विषयावर संशोधन झाले आहे, संशोधन सुरू आहे, मात्र निष्कर्षांबाबत वैज्ञानिकांमध्ये एकमत नाही.

3. दुसऱ्याच्या मनातील विचार ओळखता येतात का?

अनेक लोकांना समोरच्या व्यक्तीच्या मनातील विचार ओळखता येतात किंवा अंदाज येतो असा अनुभव ऐकायला मिळतो.

सध्या कोणत्याही व्यक्तीचे विचार केवळ टेलिपॅथीद्वारे अचूकपणे वाचता येतात, याचा विश्वसनीय असा वैज्ञानिक पुरावा नाही. मात्र निरीक्षण आणि अनुभवामुळे एखाद्याच्या मनःस्थितीचा अंदाज घेता येऊ शकतो.

4. टेलिपॅथी आणि Sixth Sense यांचा संबंध आहे का?

काही लोक टेलिपॅथीला Sixth Sense म्हणजे सहावे इंद्रिय याचा एक प्रकार मानतात. मात्र ही प्रामुख्याने एक संकल्पनात्मक किंवा आध्यात्मिक जोड आहे; वैज्ञानिकदृष्ट्या ती निश्चित झालेली नाही.

5. ध्यान केल्याने टेलिपॅथीची क्षमता विकसित होते का?

हो, ध्यानामुळे एकाग्रता, आत्मनिरीक्षण आणि मानसिक शांतता वाढण्यास मदत होऊ शकते. मात्र ध्यान केल्याने दुसऱ्याचे विचार वाचता येतात, हे वैज्ञानिकदृष्ट्या अजून सिद्ध झालेले नाही.

6. एखाद्याचा विचार केला आणि त्याचा फोन आला तर ती टेलिपॅथी आहे का?

टेलीपॅथीच असेल असे नाही. तर तो योगायोग असू शकतो किंवा त्या व्यक्तीशी संबंधित आधीची माहिती, आठवणी आणि अपेक्षा यामुळे सुध्दा असे घडू शकते.

7. टेलिपॅथीवर संशोधन झाले आहे का?

हो. Ganzfeld experiments आणि इतर parapsychological studies मध्ये टेलिपॅथी किंवा संबंधित मानसिक घटनांचा अभ्यास करण्यात आला आहे. मात्र या संशोधनाच्या निष्कर्षांवर आजही चर्चा आणि मतभेद दिसून येतात. 

8. जुळ्या भावंडांमध्ये टेलिपॅथी खरोखर असते का? 

जुळ्या भावंडांचे संगोपन एकाच वातावरणात झाल्यामुळे आणि ते एकमेकांच्या खूप जवळ असल्यामुळे त्यांचे विचार जुळण्याची शक्यता जास्त असते. ज्याला मानसशास्त्रात भावनिक जवळीक म्हटले जाते. 

9. टेलीपॅथी प्रत्येकाला शिकता येऊ शकते का? 

काही लोकांचा असा दावा आहे की, ध्यान आणि एकाग्रतेने मानसिक शक्ती वाढवता येते, परंतु टेलिपॅथी ही कोणतीही शिकण्याची कला नाही. तसेच याबाबत कोणताही शास्त्रीय पुरावा नाही.छ


संबंधित लेख (Related Articles)

एखादी व्यक्ती आठवली आणि लगेच तिचा फोन आला, असे का होते? योगायोग की Sixth Sense?

अचानक अस्वस्थ वाटणे! हा Sixth Sense संकेत असू शकतो 

अंतर्ज्ञान (Intuition) आणि सहावे इंद्रिय यात काय फरक आहे?

सहावे इंद्रिय म्हणजे काय? विज्ञान, मानसशास्त्र आणि अनुभवांच्या आधारे संपूर्ण माहिती

सहावे इंद्रिय जागृत करण्याचे 7 प्रभावी मार्ग

झोपेत अचानक पडल्यासारखे का वाटते? | Hypnic Jerk म्हणजे काय?

तुम्हाला Sixth Sense आहे का? ही 10 लक्षणे तपासा https://sixthsensemarathi.blogspot.com/2026/07/sixth-sense-10.html
_____________________________________________

युट्यूब चॅनल- Sixth Sense Power 

विश्वासार्ह संदर्भ  (References)

  1. Society for Psychical Research (SPR) – History and research into claimed psychical phenomena.
    https://www.spr.ac.uk/

  2. Milton, J., & Wiseman, R. (1999).
    Does Psi Exist? Lack of Replication of an Anomalous Process of Information Transfer.
    Psychological Bulletin, 125(4), 387–391.

  3. Cardeña, E. (2018).
    The Experimental Evidence for Parapsychological Phenomena: A Review.
    American Psychologist, 73(5), 663–677.
    https://doi.org/10.1037/amp0000236

  4. Bem, D. J. (2011).
    Feeling the Future: Experimental Evidence for Anomalous Retroactive Influences on Cognition and Affect.
    Journal of Personality and Social Psychology, 100(3), 407–425.

  5. Encyclopaedia Britannica – Telepathy
    Telepathy आणि related parapsychological concepts संदर्भातील माहिती.

  6. Journal of Parapsychology

  7. भारतीय योगशास्त्र आणि प्राचीन ग्रंथ संदर्भ 

संदर्भाबाबत महत्त्वाची नोंद: 

वरील संशोधनांमध्ये टेलिपॅथी/परामनोवैज्ञानिक घटनांबाबत वेगवेगळे निष्कर्ष आणि मतप्रवाह आढळून येतात. त्यामुळे कोणत्याही एका अभ्यासावर आधारित “टेलिपॅथी सिद्ध झाली” असा निष्कर्ष काढणे योग्य नाही.


तुम्हाला काय वाटते?

तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का की तुम्ही एखाद्या व्यक्तीचा विचार केला आणि त्या व्यक्तीने लगेच फोन आला?

तुमचा हा अनुभव योगायोग, Intuition की Telepathy यापैकी कशाशी संबंधित असू शकतो असे तुम्हाला वाटते?

तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा.

अशाच प्रकारे Sixth Sense, मानवी मन, मानसशास्त्र, अध्यात्म, स्वप्नशास्र आणि रहस्यमय अनुभवांमागचे विज्ञान समजून घेण्यासाठी Sixth Sense Marathi वरील इतर लेखही वाचा. _____________________________________________

लेखक: Prof. Dr. Sanjay Jadhav

Founder – Sixth Sense Marathi

(संशोधन, मानसशास्त्र, स्वप्नशास्र, अंतर्ज्ञान आणि सहावे इंद्रिय या विषयांवर माहितीपूर्ण लेखन)


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

रात्री 3 वाजता जाग का येते?

झोपेत अचानक पडल्यासारखे का वाटते? | Hypnic Jerk म्हणजे काय?

साप स्वप्नात दिसणे शुभ की अशुभ? स्वप्नशास्त्र, मानसशास्त्र आणि विज्ञान काय सांगते?